कर्जत / नेरळ : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना कर्जत तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला. चिकणपाडा गावातील एकाच कुटुंबातील ९ वर्षाच्या मुलासह त्याचे वडील व आई या तिघांची हत्या करण्यात आली. मृत महिला ही सात महिन्यांची गर्भवती होती. दोघांचे मृतदेह नाल्यात फेकून दिले होते. एकाचा मृतदेह घरातच होता. मदन जैतू पाटील (वय ४०), पत्नी अनिशा मदन पाटील (वय २८) व मुलगा विवेक पाटील (वय ९) यांचा समावेश आहे. पोलिसांनी संशयित म्हणून कुटुंबातीलच हनुमंत पाटील याला ताब्यात घेतले आहे.
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रविवारी सकाळी नेरळ-कळंब रस्त्यावरील नाल्यामध्ये मदन पाटील यांचा मुलगा विवेकचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याच नाल्यात अनिशा यांचाही मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी त्यांच्या घरी चौकशी केली असतात घरात मदन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. नेरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
अर्धे घर नावावर करत नाहीत म्हणून खून?
■ मृत अनिशा यांचे माहेर हे चिकणपाडा गावापासून दीड किलोमीटरवरील माले गावातील आहे. त्यांचा भाऊ रुपेश यांनी नेरळ पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली.
■ तक्रारीत त्यांनी अर्धे घर नावावर करत नाही म्हणून हनुमंत पाटील यानेच तिघांना ठार केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पाटील कुटुंब हे मूळचे कळंब बोरगाव येथील.
■ जैतू पाटील यांनी येथे जागा घेऊन घर बांधले होते. मुलांच्या विवाहानंतर हे घर त्यांच्या ताब्यात दिले होते. घरात मदन व हनुमंत यांची कुटुंबे राहत होती.