मीरा रोड - काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील हाटकेश भागात भार्इंदर विभागाचे सहायक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मोठ्या पोलीसफाट्यासह केलेल्या कारवाईत तीन लाख रुपये किमतीचे ३० ग्रॅम कोकेन सापडले असून तिघा नायजेरियन नागरिकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांचा धुमाकूळ व अनैतिक धंद्यांविरोधात स्थानिकांनी सातत्याने तक्रारी, निवेदने देऊन आंदोलनेही केली होती; पण पोलिसांकडून कारवाई होत नव्हती.पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काशिमीराचे निरीक्षक वैभव शिंगारे, नयानगरचे निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक जगदीश बांगरसह ठाकरे, गायकवाड, सिसोदिया, दाभाडे, रोकडे, फडतरे, पारधी, पाटील व दंगल नियंत्रण पथक अशा मोठ्या फौजफाट्यासह येथील पटेल इमारतीत धाड टाकली.यावेळी जमलेल्या नायजेरियन नागरिकांच्या गोतावळ्यातील मायकल न्युडे (३५), ओकोरो अुक्वू (२५) व ओमेन चेक्युबे (२१) या तिघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याजवळ ३० ग्रॅम कोकेन सापडले. त्याची किंमत तीन लाख रुपये आहे. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त केले आहेत. त्यांनी कोकेन विक्रीसाठी आणले होते का व कुठून आणले होते, याचा तपास सुरू आहे.लोकांनी काढला होता मोर्चाहाटकेश भागात नायजेरियन नागरिकांकडून बेकायदा डिस्को बार, अमली पदार्थांची विक्री तसेच वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याबद्दल नागरिकांसह शिवसेनेने पोलिसांना तक्रारी, निवेदने दिली होती. कारवाई होत नसल्याने संतप्त लोकांनी मोर्चे काढून निदर्शने केली होती.
कोकेनसह तीन नायजेरियन नागरिकांना काशिमीरातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 4:25 AM