वास्को: आरोसी भागात राहणाऱ्या केनथ साल्ढाना ह्या ४१ वर्षीय इसमाला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी वेर्णा पोलीसांनी एका ६५ वर्षीय वृद्ध महीलेसहीत अन्य तीन तरुणांना अटक केली आहे. पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती देण्यात आली नसल्यास जिवंत मारण्याची धमकी केनथ याला दिल्याने त्यांने शनिवारी (दि.३०) याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. ह्या प्रकरणात वेर्णा पोलीसांनी शनिवारी त्या तीन तरुणांना अटक केली असून रविवारी (दि.१) सदर प्रकरणातील ६५ वर्षीय संशयित वृद्ध महीलेला अटक केली.
वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीश मडकईकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार खंडणी देण्याची मागणी करून तसे केले नसल्यास जिवंत मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण शनिवारी पोलीस स्थानकात नोंद करण्यात आले. आरोसी येथे राहणाºया केनथ यांने त्याला पाच लाख रुपयांची खडणीसाठी धमकी आल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंद करताच या प्रकरणातील संशयित सलीम डोड्डामणी (वय २४), इमाम बेहट्टी (वय १९) व खुरुंम्म हुसेंन (वय ३६) यांना शनिवारी ताब्यात घेऊन नंतर अटक केली. सदर प्रकरणात अटक करण्यात आलेले तिनही तरुण मागच्या काही काळापासून गोव्यात राहत असल्याची माहीती तपासणीत पोलीसांसमोर उघड झाली आहे. अटक करून ह्या प्रकरणात चौकशीला सुरवात केली असता सदर खंडणी प्रकरणात मडगाव येथे राहणारी पिरा फाल्कांव नावाची ६५ वर्षीय वृद्ध महीला शामील असल्याचे पोलीसांसमोर उघड झाले. पिरा या वृद्ध महीलेनेच त्या तीन तरुणांना केनथ कडून खंडणी घेण्यासाठी पुढे काढले होते असे पोलीसांना चौकशी वेळी उघड झाले. यानंतर रविवारी वेर्णा पोलीसांनी सदर प्रकरणात पिरा फाल्कांव ह्या वृद्ध महीलेला अटक केली.
केनथ व पिरा नातेवाईक असून दोघात काही व्यवसायाच्या विषयावरून तसेच अन्य काही कारणावरून दुश्मनी असल्याचे पोलीसांना तपासणीत समजले आहे. शनिवारी अटक करण्यात आलेल्या त्या तीन संशयितांना न्यायाधीक्षासमोर उपस्थित करण्यात आले असता त्यांना १२ दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने रविवारी बजाविला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर यांनी दिली. सदर खंडणी प्रकरणात वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.