रत्नागिरी - पूर्ववैमनस्यातून चारजणांवर तलवारींनी हल्ला झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. पोलिसांनी या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर हाताचा अंगठा तुटलेल्या उबेदउल्ला होडेकर याला कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
शहराच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीनजीक शुक्रवारी रात्री १0 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. उबेदउल्ला निजामुद्दिन होडेकर (वय ३६), मुदस्सर मेहबुब काझी (वय३५) आणि अझहर इकबाल सावंत (वय३२) या तिघांवर एका जमावाने हल्ला केला. या तिघांचा काही लोकांशी पूर्वी वाद झाला होता. त्यातून मारामारीचाही प्रकार घडला होता. त्या वादातूनच हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रत्नागिरीतील अल्ताफ जाफर संगमेश्वरी, विजय माने, अन्या वालम, हर्षल शिंदे, बाबा नाचणकर, मुन्ना देसाई, अभिजित दुडे यांच्यासह अन्य चार-पाचजणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व संशयितांनी उबेदउल्ला आणि त्याच्या दोन मित्रांवर तलवारी व अन्य धारदार हत्यारांनी वार केले. या सर्वांना पिस्तुलाचा धाकही दाखवण्यात आला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले. यातील मुदस्सर आणि अझहर त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, उबेद याला कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
राजकीय वाद नाही
या प्रकारातील जखमी उबेदउल्ला होडेकर हा स्वाभिमान संघटनेच्या अल्पसंख्याक आघाडीचा रत्नागिरी तालुकाध्यक्ष आहे. संशयित आरोपींमधील अल्ताफ संगमेश्वरी हे राजापूर अर्बन बँकेचे संचालक असून, शिरगाव ग्रामपंचायतीच उपसरपंच आहेत. अर्थात हा हल्ला कुठल्याही राजकीय कारणातून झाला नसून, आधी झालेल्या वादातून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुन्ना देसाई आणि बावा नाचणकर अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.