बुलडाणा: पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील उजाड खडका गाव परिसरात झालेल्या दुहेरी खून प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी लातूर जिल्ह्यातील दोघांना तर बुलडाणा जिल्ह्यातून एकास अटक केली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात येत असलेल्या सिंदी जवळगा येथील मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांचा बुलडाणा जिल्ह्यातील खडका शिवारात २१ सप्टेंबर रोजी खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे मृतकांचीही ओळख पटविण्याचे बुलडाणा पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या प्रकरणात लातूर जिल्ह्यातील बिंदगीहाळ येथील शेख मुस्तफा उस्मान साब, निलंगा तालुक्यातील दापका येथील आनंदनगर मध्ये राहणार्या संदीप उर्फ संदीपान निवृत्ती पवळे आणि बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी बुद्रूक येथील मधुकर मारोती लहाने यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जालना, बिलासपूर (छत्तीसगड) आणि राहेरी बुद्रूक येथून ३० सप्टेंबर व एक आॅक्टोबर रोजी अटक केली. लातूर जिल्ह्यातील मधुकर गोरोबा घोलप आणि परमेश्वर घोलप यांचा बुलडाणा जिल्ह्यात खून करून खडका या उजाड गावात त्यांचे मृतदेह २१ सप्टेंबरला आणून टाकण्यात आले होते. मृतक मधुकर घोलप यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र बनावट असल्यामुळे त्यांना निलंगा येथील कै. सरस्वती शिंदे निवासी अपंग विद्यालयातून पहारेकरी या पदावरून कमी केले होते. त्याचा राग मनात धरून मृतक मधुकर घोलप शाळेविरोधात समाजकल्याण विभाग (लातूर) येथे तक्रारी करत होता. त्याचा त्रास संस्थेला होत होता. सोबतच याच शाळेत संदीप पवळेने त्याचे राहते घर विकू त्याचा भाऊ हनुमंत यास आठ लाख रुपये डोनेशन देऊन लावले होते. मात्र मधुकर घोलप याच्या तक्रारीमुळे हनुमंतलाही कामावरून घरी बसावे लागले होते. परिणामी संस्थाध्यक्ष गोरख शिंदे, आरोपी संदीप पवळे यांनी कट रचून उपरोक्त आरोपींच्या मदतीने देवदर्शनाला जाण्याच्या बहाण्याने मुधकर घोलप याचा काटा काढल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देवदर्शनाच्या निमित्ताने त्याच्या सोबत असलेला परमेश्वर घोलप याचाही यात जीव गेला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अबुलकर, पोलिस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, प्रदीप आढाव, मुकूंद देशमुख, सहाय्यक फौजदार शेषराव अंभोरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास खानझोडे, सुधाकर काळे, पोलिस नायक विलास काकड, रघुनाथ जाधव, गजानन आहेर, दीपक पवार व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली.
ताड शिवणी फाट्यावर खून
मधुकर घोलप आणि परमेश्वर घोलप यांचा खून ताडशिवणी फाट्यावर करण्यात आला. त्यांना दारू पाजून नायलॉनच्या दोरीने गळफास देऊन ठार मारून ओळख पटू नये म्हणून चेहर्यावर दगडाने घाव केले आणि अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडका उजाड गाव परिसरात दोघांचे मृतदेह आणून टाकले होते.
मतदार यादीतून शोधले १३४ घोलप
एका मृतकाच्या हातावर मधुकर घोलप असे गोंदलेले असल्यामुळे त्याचा आधार घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणूक आयोगाच्या राज्यातील मतदार यादीवरून १३४ मधूकर घोलप शोधून व्यक्तीश: त्यांच्याशी संपर्क करत खडका शिवारातील मृतक दोघेही लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शिंदी जवळगा येथील रहिवाशी असल्याचे शोधून काढले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तापासाला दिशा मिळाली होती.
तीन पथकाद्वारे तपास
तीन पथके प्रकरणाच्या तपासासाठी गठीत करण्यात आली होती. यामध्ये सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक सेलच्या पथकाचा यात समावेश होता. दरम्यान, छत्तीसगडमधील एसएसपी आरिफ शेख यांनीही या प्रकरणात महत्त्वपूर्ण योगदान देत बिलासपूर येथून संदीप उर्फ संदीपान निवृत्ती पवळेला अटक करण्यात मदत केली.