लातूर : जबरदस्तीने माेबाईल हिसकावत पळ काढणाऱ्या तिघा सराईत आराेपींच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ३० माेबाईल, तीन दुचाकीसह ५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी एकाला वाटेत अडवून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावत पळ काढल्याची घटना घडली होती. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. यातील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक तयार करण्यात आले. या पथकाने फिर्यादीकडे चाैकशी केली. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून पोलिस ठाण्याच्या रेकाॅर्डवरील, इतर जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी केली. दरम्यान, २१ जुलै रोजी पथकाला खबऱ्याने माहिती दिली.
या माहितीच्या आधारे प्रसाद अंगद कांबळे (१९, रा. साईबाबा नगर, लातूर), आयान अफजल शेख (वय १९) आणि ऋषिनाथ बाबुराव गांधले (२० दाेघे रा. कपिल नगर, लातूर) यांना लातुरातील आदर्श कॉलनी परिसरात चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, लातुरातील विविध भागातून इतर चार साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरुन जाणाऱ्या, पायी जाणाऱ्यांना अडवून मोबाईल पळविल्याची कबुली दिली. चाेरीतील ३० मोबाईल, तीन दुचाकी असा ५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक चाैकशी केली असता शिवाजीनगर - चार, एमआयडीसी - दाेन गुन्हे केल्याचे उघडकीस आले. तपास पोउपनि. सुरेश पोगुलवार हे करत आहेत. ही कारवाई पोनि. संजीवन मिरकले, सपोनि. विशाल शहाणे, संजय कांबळे, युवराज गिरी, बालाजी कोतवाड, काकासाहेब बोचरे, पद्माकर लहाने, मिलिंद कांबळे यांच्या पथकाने केली.