मुंबई - प्रसिद्ध हिंदी टीव्ही सिरियल्स प्रोड्युसरकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला गुन्हे शाखा कक्ष - ११ च्या पोलिसांनीअटक केली आहे. रोहन अशोक रेडेकर, शशांक वर्मा, भूपेशकुमार प्रसाद अशी या तिघांची नावे आहे. यातील एक आरोपी हा मुंबईतील प्रसिद्ध राजकीय नेत्याचा भाचा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मालाड येथील बांगूर नगर परिसरात राहणाऱ्या प्रोड्युसरकडे अटक तीन आरोपी मागील अनेक दिवसांपासून खंडणीसाठी फोन करत होते. एका कुख्यात गुंडाच्या नावाने ते वारंवार प्रोड्युसरला धमकावत होते. त्याचप्रमाणे पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होते. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्या प्रोड्युसरने गुन्हे शाखा कक्ष - ११ च्या पोलिसांची मदत घेतली. त्यानुसार पोलिसांनी या तिघांना गोराई परिसरातून अटक केली. यातील एक आरोपी हा प्रसाद हा पूर्वी त्या प्रोड्युसरकडे कामाला होता. आर्थिक देवाण घेवाणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळेत प्रसादने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने प्रोड्युसरला त्रास देण्यास सुरूवात केली. यातील शशांक हा एका बड्या राजकीय नेत्याचा भाचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. हे तिघेही मालाड परिसरातील रहिवाशी आहे. व्हॉटस ऍपवर देखील तक्रारदारास मेसेज पाठविण्यात आले होते. त्या संबंधित व्हॉटस ऍपचे प्रोफाईल फोटो म्हणून कुख्यात गुंड छोटा राजनचा फोटो ठेवण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदार प्रोड्युसरने गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रार दाखल करण्यास सांगितले.