मंगेश कराळे
नालासोपारा - तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीसांनी घरफोडी, चोरी करणाऱ्या सराईत त्रिकुटाला अटक करून दोन गुन्ह्यांची उकल करत ५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तुळींज पोलीस ठाण्याचे हददीत घरफोडी चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेवुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांच्या अनुषंगाने तुळींज पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असलेले अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्याकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपी देवेंद्र गणेश शेट्टी आणि शेखर नटराज नायर या दोघांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्यांनी दाखल असलेल्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक केली. या गुन्हयातील घरफोडी केलेले ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदीचा कमरबंद, एल. जी. कंपनीचा ६५ इंच कलर टीव्ही असा एकुण ३ लाख ८८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपीत यांचेविरुध्द ठाणे शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात ६, मंबई शहर आयुक्तालय कार्यक्षेत्रात ४ व मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रात १ असे गुन्हे दाखल आहेत.
तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तुळींज पोलीस ठाण्यात १६ जानेवारीला दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीत प्रशांत रत्नेश सिंग याला ताब्यात घेवुन विचारपुस केली. त्याने तो नमुद गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास अटक केली. त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यात चोरीला गेलेला होनीव्हेल कंपनीचे मोबाईल डिव्हाईस मशीन व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा १ लाख ५५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रेे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, गिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, जमादार, पांडुरंग केंद्रे, छपरीबन, राऊत यांनी केली आहे.