कल्याण-भारतीय चलनातील बनावटी नोटा बाळगणा:या तीन जणांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख १२०० रुपयांच्या बनावटी नोटा मिळून आल्या आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस अधिकारी दीपक सरोदे यांना माहिती मिळाली की, कल्याण पश्चिमेतील अनिल पॅलेज लॉजमध्ये तीन तरुण थांबले आहेत. त्यांच्याकडे बनावटी नोटा आहेत. ही माहिती मिळताच अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक लॉजमध्ये पोहचले. लॉजमधील एका रुममध्ये तीन तरुण मिळून आले. त्यांच्या रुमची तपासणी केली असता त्यांच्याकडे २ लाख १२०० रुपयांच्या बनावटी नोटा मिळून आल्या. अटक आरोपींची नावे मोहम्मद आरीफ, सूरज पूजारी आणि करण रजक अशी आहे. यापैकी करण हा कल्याण पूर्व भागातील पत्री पूल येथे राहणार आहे. तो रिक्षा चालविण्याचा धंदा करतो. सूरज हा हमालीचे काम करतो. तर मोहम्मद हा उत्तर प्रदेशात राहणारा आहे. काही दिवसापूर्वी तो दुकानात यायचा. काही वस्तू द्यायचा आणि त्याच्या बदल्यात बनावटी नोटा द्यायचा. बाजारात लहान सहान वस्तू खरेदी करुन नोटा चालविण्याची त्यांची पद्धत होती. अटक आरोपींनी या बनावटी नोटा दिल्लीहून आणल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. या त्रिकूटाचा म्होरक्या अद्याप पोलिसांच्या जाळयात सापडलेला नसला तरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपासकामी पोलिस दिल्लीला रवाना होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.