लातूर : बार्शी-लातूर महामार्गावरील हरंगुळ शिवारात असलेल्या एका किराणा गाेदामाचा पाठीमागील पत्रा कापून अज्ञातांनी १२ लाख रुपयांची तिजाेरी पळविल्याची घटना १९ ऑक्टाेबरराेजी घडली हाेती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता़. यातील तिघांच्या साेलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून चारचाकी पीकअप वाहन, चार माेबाईल, गुन्ह्यात चाेरीला गेलेली रक्कम २ लाख ९७ हजार असा एकूण ११ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, लातूर-बार्शी महामार्गावरील हरंगुळ शिवारात रस्त्यालगत पत्र्याच्या शेडचे किराणा मालाचे गाेदाम उभारण्यात आले हाेते. दरम्यान, १९ ते २० ऑक्टाेबरराेजीच्या रात्री अज्ञात चाेरट्यांनी या गाेदामाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश केला. गाेदामात ठेवण्यात आलेली तिजाेरीच चाेरट्यांनी पळविली. यामध्ये तब्बल १२ लाखांची राेकड हाेती. याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पाेलीस पथकांनी तपासाची चक्रे गतिमान केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही चाेरट्यांचा शाेध घेतला जात हाेता. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीआधारे संशयित म्हणून पेडगाव (ता. श्रीगाेंदा, जि. अहमदनगर) येथील भरत लक्ष्मण नागरे (रा. बाेरगाव, ता. करमाळा, जि. साेलापूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चाैकशी केली असता, त्याने हा गुन्हा आपल्या अन्य दाेन साथीदारांसाेबत केल्याची कबुली दिली़. त्याच्या माहितीनुसार, रायचंद परमेश्वर धाकताेड (रा. विटा, ता. करमाळा, जि. साेलापूर) आणि परशुराम संभाजी घाेडके (रा. पेडगाव, ता. श्रीगाेंदा, जि. अहमदनगर) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून एक चारचाकी वाहन, चार माेबाईल आणि चाेरीतील २ लाख ९७ हजारांची रक्कम असा ११ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली.
ही कारवाई पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सपाेनि. सूरज गायकवाड, सपाेनि. संजय भाेसले, पाेलीस हवालदार राजेंद्र टेकाळे, राम गावारे, सुधीर काेळसुरे, पाेलीस नाईक नवनाथ हसबे, याेगेश गायकवाड यांच्या पथकाने केली.