मुंबई : घाटकोपरमधील बांधकाम साइटचे काम मिळावे म्हणून कर्नाटकातील व्यावसायिकाच्या हत्याकांडात सहभागी झालेल्या ३ शुटरना मंगळवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गँगस्टर युसूफ बचकानाने त्यांना घाटकोपरच्या कामासह १० लाखांची सुपारी दिली होती.कर्नाटक येथील रिअल इस्टेट व्यावसायिक इरफान अल्लाबक्ष हंचनाल ऊर्फ अलियाज ऊर्फ फूट इरफान (४५) यांची ६ आॅगस्ट रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी कर्नाटक येथील ओल्ड हुबळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
म्हैसूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुलेमान कादरी ऊर्फ युसूफ बचकानाच्या फोनवरून राजेंद्र मोहनसिंग रावत ऊर्फ राजू नेपाळी (३८) याने शूटर पुरविले. गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने सोमवारी नेपाळीला बेड्या ठोकल्या. या कारवाईपाठोपाठ यातील शूटर मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७चे पोलीस उपनिरीक्षक संजय सुर्वे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेत, घाटकोपर, वडाळा आणि चेंबूर येथून त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत.
यात, घाटकोपरचा रहिवासी असलेला नीलेश गोविंद नांदगांवकर (४०) हा २०१४ मध्ये व्हीपी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड जबरी चोरीच्या गुन्ह्यांत आर्थर रोड कारागृहामध्ये बंद होता. त्यावेळी बचकाना व राजू नेपाळीसुद्धा आर्थर रोड कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांत बंद होता. याच दरम्यान त्यांची ओळख झाली.