कल्याण रेलवे स्थानकात चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपासून प्रवासांची बॅग आणि मोबाईल चोरुन चोरटे पसार होत होते. एका आरोपीला कल्याण आरपीएफच्या पथकाने रंगेहात पकडले. त्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. तसेच, अन्य दोन आरोपींनीही कल्याण जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राजू गायकवाड, मेघा शेख आणि राजेश प्रत्येकी अशी आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी असते. लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी प्रवासी गाडी येण्याच्या आधीच गाडीच्या प्रतिक्षेत थांबलेले असतात. काही प्रवाशी बुकिंग ऑफिसच्या आवारात बससतात. प्रवासी बसलेले असताना त्यांचा झोपेचा फायदा घेत चोरटे संधी साधत प्रवाशांच्या किंमती वस्तूंची चोरी करून पसार होतात. अशाच तीन घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडल्याने एकच खळबळ उडाली होती.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याण जीआरपी आणि आरपीएफ यांच्या पथकाने संयुक्त तपास सुरु केला. जीआरपीचे पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख आणि आरपीएफचे अधिकारी अनिल उपाध्याय या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. यामध्ये सचीन साठे नावाच्या एका व्यक्तीचा खिशात हात टाकून मोबाईल चोरणारा राजू गायकवाड, तसेच मोहंमद अजीउल अन्सारी या प्रवाशाची बॅग चोरणारा राजेश प्रत्येकी याला आरपीएफ जवानांनी रंगेहात फलाटावर पकडले आहे. याशिवाय, मेराज खान यांचा मोबाईल चोरणारा मेघा शेख यालाही अटक करण्यात आली.