ठाणे : पिठाच्या गोण्या चोरी करण्याच्या उद्देशाने दोन ट्रक चालकांसह क्लीनरची हत्या करणाऱ्या अनिस नबी खाँ, सकुर अब्दुल रहेमान खाँ आणि अजितकुमार मिश्रा यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१२ साली हे हत्याकांड घडले होते.आरोपींनी ट्रकचालक राजेश यादव, हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांची हत्या करून क्लीनर छोटू ऊर्फ श्रीकांत यादव याला जखमी केले होते. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०१२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी केलेला युक्तिवाद, पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून न्यायालयाने बुधवारी तिघांना दोषी ठरवले होते. गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना, न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. भादंवि कलम ३९७ अन्वये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:14 AM