लोणी काळभोर - पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ३ महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील चेतन ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.नंदिनी ऊर्फ नंदा प्रकाश चव्हाण (वय ३८), रिना यशवंत पवार (वय २७, दोघी रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे) व पूनम काळू पडवळ (वय २९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) यांच्यासमवेत एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करून लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मागील वर्षी ११ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १.१० ते १.२० च्या सुमारास येथील गणपती चौकात असलेल्या चेतन ज्वेलर्स या सोन्याचांदीचे दुकानात तीन अनोळखी महिला व एक अल्पवयीन बालक यांनी संगनमताने मिळून दागिने खरेदीचा बहाणा करून दुकानदाराची नजर चुकवून ५० ग्रॅम वजनाचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. मालक गोपाळ शंकर वर्मा यांना सीसी टीव्ही फुटेज पाहिले. नंतर चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने गुन्ह्याची माहिती व सीसीटीव्ही फूटेज घेऊन ते मल्टीमीडिया, व्हॉट्सअॅप या माध्यमाद्वारे प्रसारित केले होते. त्यामुळे फुटेजमधील वर्णनाच्या महिला कात्रज पुणे परिसरात राहत असल्याची माहिती खब-याकडून मिळाली. माहितीच्या आधारावर कात्रज येथे सापळा रचून तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या टोळीकडून अशा प्रकारचे चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व उपनिरीक्षक तलवार हे अधिक तपास करीत आहेत.
सराफा दुकानातून दागिने लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:53 AM