अंबरनाथ: अंबरनाथएमआयडीसी मधील आयटीआय परिसरात असलेल्या रासायनिक कंपनीत भुयारी टाकीत उतरलेल्या 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा काम अग्निशमन दलामार्फत करण्यात येत आहे. (Three workers suffocated in Chemical factory Ambernath.)
कंपनीत वेस्ट ऑईलवर प्रक्रिया करून रिसायकल करण्याचं काम केलं जाते. ही कंपनी दोन वर्षांपासून बंद असून सध्या कंपनीच्या साफसफाई आणि नूतनीकरणाचं काम सुरू होते. यासाठी गोवंडी इथून चार कामगारांना रंगकामासाठी आणण्यात आले होते. या कामगारांना मागील आठवडाभरापासून कंपनीच्या आवारात असलेल्या केमिकलच्या भूमिगत टाक्या साफ करण्यास सांगण्यात आलेनहोते. त्यापैकीच एक टाकी साफ करत असताना अचानक या कामगारांना केमिकलच्या उग्र दर्पामुळे गुदमरू लागल्याने एक कामगार बाहेर आला. तर इतर तिघे टाकीतच बेशुद्ध पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेले तिन्ही कामगार मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांना या कामासाठी कुठल्याही सुरक्षात्मक वस्तू, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पालिका अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. या सगळ्यामध्ये निष्काळजीपणा दिसत असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या टाकीत रसायनिक द्रव साठवले जात होते. असे असतानाही कामगारांना त्या टाकीत कोणतीही सुरक्षा साधन न वापरता काम करण्यासाठी उतरविण्यात आले. ही घटना घडल्यावर अग्निशमन दल लागलीच घटनास्थळी गेले असून या टाकीतून कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तर या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार धरून थेट कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी केली.