मोठमोठ्या मॉलमध्ये सध्या लहान मुलांच्या विविध गेम्सचं आकर्षण असते. मात्र हैदराबाद इथं घडलेल्या प्रकाराने पालकांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी प्रसिद्ध मॉलमध्ये एका ३ वर्षीय मुलीच्या हाताची ३ बोटे कापली गेली. ही मुलगी गेमिंग झोनमध्ये गेम खेळत होती. बंजारा हिल्स रोडवरील या मॉलच्या चौथ्या मजल्यावर लहान मुलांसाठी गेमिंग झोन आहे. येथे गेम खेळण्यासाठी असलेल्या एका मशिनमध्ये लहान मुलीचा हात अडकला आणि काही सेकंदातच तिच्या हाताची ३ बोटे कापली. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. या घटनेने पालकांमध्ये दहशत पसरली आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे आणि व्यवस्थापनाच्या कमतरतेमुळे आमच्या मुलीच्या हाताची ३ बोटे कापली. या मुलीचे नाव मेहविश लुबना असे आहे. शनिवारी दुपारी पालक त्यांच्या ३ मुलांसह एका मॉलमध्ये गेले होते.
लुबना आणि इतर मुलांना घेऊन आई चौथ्या मजल्यावरील गेमिंग झोन क्षेत्रात गेली. ज्याठिकाणी लुबना गेम खेळत होती तेव्हा गेमिंग मशीनचा मागील दरवाजा उघडाच होता. मशीनला पकडून ती गेम खेळत होती. त्यावेळी अचानक मशीनचा दरवाजा बंद झाला. तिचा हात मशिनच्या दरवाजात अडकला. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे दरवाजा उघडून ठेवला होता असं व्यवस्थापनाने सांगितले. मात्र यामुळे एका चिमुकलीच्या हाताची बोटे कापली गेली.
मॉल व्यवस्थापक आणि गेमिंग झोनमधील कर्मचाऱ्यांवर आरोपदुर्घटनेनंतर या मुलीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे मुलीच्या हाताची बोटे पुन्हा लावण्यात आली. घटनेच्यावेळी कुणीही कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. गेमिंग झोनमध्ये सीसीटीव्ही नसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.