लातूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी तीन वर्षांचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुलगी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मजुरीसाठी कामावर गेली होती. ती घराकडे परतत असताना आरोपी धीरज दिलीप देशमुख (रा. कातपूर) हा दुचाकीवर येऊन विनयभंग केला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.सी. कांबळे यांच्यासमोर झाली. तेव्हा सरकार पक्षाच्या वतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी मुलगी व साक्षीदारांचा पुरावा महत्त्वाचा धरून न्या. कांबळे यांनी आरोपीला दोन्ही गुन्ह्यासाठी तीन वर्षे कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. मंगेश महिंद्रकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. उमाकांत ना. राऊत, अॅड. अंकिता धूत, अॅड. विद्या वीर, पोउपनि. आवेज काझी यांनी साह्य केले.