पिंपरी : भरधाव ट्रकने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर टेम्पोला ट्रकने ओढत नेले. त्यामुळे टेम्पोतील एक जण रस्त्यावर पडून त्याच्या अंगावरून ट्रक गेला. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यासर ट्रकने इतर दोन वाहनांचेही नुकसान केले. नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी येथे शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात झाला.
शिवाजी बाजीराव दंडवते (वय ३२), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय राजेंद्र दंडवते (वय २४, रा. लांडगे वस्ती, हिंदराज कॉलनी क्रमांक ३, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक प्रदीपसिंग विजयसिंग सोधा (वय २९, रा. कुकुमा, ता. कच्छ, जि. भूज, गुजरात) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोधा हा अंमली पदार्थ सेवन करून त्याच्या ताब्यातील ट्रक नाशिक कडून पुण्याकडे भरधाव घेऊन जात होता. त्यावेळी फिर्यादी यांचे चुलते शिवाजी दंडवते यांच्या टेम्पोला आरोपी याच्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे टेम्पो ट्रकला अडकला. टेम्पोमध्ये चालक अडकला असल्याचे माहीत असतानाही आरोपी याने ट्रक चालवून टेम्पोला ओढत नेले. त्यामुळे टेम्पोमधील शिवाजी दंडवते रस्त्यावर पडले. यावेळी ट्रकचे चाग त्यांच्या अंगावरून गेले. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने शिवाजी दंडवते यांचा मृत्यू झाला. दंडवते यांच्या टेम्पोसह एक चारचाकी वाहन तसेच एका रिक्षालाही ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक आरोपी सोधा तेथून निघून गेला. या अपघाताबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.