मुंबई - मालमत्तेच्या वादातून ज्येष्ठ नागरिकाची गुजरात ते मुंबई प्रवासादरम्यान हत्या केल्याच्या आरोपावरून आझाद मैदान पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत.
मूळच्या गुजरातच्या रहिवासी असलेल्या ज्योत्स्नाबेन कांतीलाल पटेल (६६) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्या सध्या इंग्लंडमध्ये राहतात. तक्रारीनुसार, १६ एप्रिल ते २०२१ ते १७ एप्रिल २०२४ दरम्यान हा प्रकार घडल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी गोरेगावमधील महिलेसह गुजरातच्या व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांचा भाऊ अमृतलाल कांतीलाल पटेल (७०) यांची आरोपींनी हत्या केल्याचा आरोप आहे. १६ एप्रिलच्या रात्री रोजी अमृतलाल यांच्यासाठी ठेवलेल्या केअर टेकर दाम्पत्याला आरोपीने घरी जाण्यास सांगितले.
त्यानंतर, रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी महिला तेथे आली. या महिलेने अमृतलाल यांच्याविरुद्ध बोरीवली न्यायालयामध्ये दाखल केलेल्या केसमध्ये तिला मेंटनन्सची रक्कम देण्याचा आदेश न्यायालयाने अमृतलाल यांना दिला होता. मात्र, अमृतलाल यांनी तिला मेन्टेनन्स रक्कम न देता, आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील केले होते. याच रागातून महिलेने अन्य आरोपीसोबत कट रचून अमृतलाल यांना मुंबईत उपचारासाठी घेऊन येत असताना, गुजरात ते मुंबई प्रवासाच्या दरम्यान त्यांची हत्या केली, तसेच पुरावे नष्ट केल्याचा आरोप करत पटेल यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. अखेर, या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत.
यापूर्वी नैसर्गिक मृत्यूचा अहवाल
१६ एप्रिल २०२१ रोजी अमृतलाल यांना पुढील उपचारासाठी गुजरातहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली, तसेच प्राथमिक अहवालात नैसर्गिक मृत्यू असल्याचे समोर आले होते. कुटुंबीयांनी यापूर्वी स्थानिक न्यायालयात धाव घेतली. तेथेही नैसर्गिक मृत्यूचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर, त्यांच्या बहिणीने सत्र न्यायालयात धाव घेत, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली.