वसई - वसईच्या रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावर एका अनोळखी माथेफिरूने रेल्वे प्रवाशावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या हल्याने पादचारी पुलावरील अन्य प्रवाशांनी थरार पाहिल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. रेल्वे पोलिसांनी फरार अनोळखी माथेफिरूविरुद्ध हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत तपास करत आहे. जखमी रेल्वे प्रवाशाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
वसईमध्ये राहणारे समीर मर्चंट (52) हे मंगळवारी संध्याकाळी कामानिमित्त चर्चगेटला जाण्यासाठी वसई स्थानकात आले आणि पादचारी पुलावरून प्लटफॉर्म क्रमांक 3 वर जात होते. त्याचवेळी अचानक एका अनोळखी माथेफिरूने त्यांना अडवून त्यांच्यावर टोच्याने सपासप वार कऱण्यास सुरवात केली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर त्यांच्यावर हल्ला करतच राहिला. त्यांच्या छातीवर, खांद्याला, हातावर दुखापत झाल्याने ते जमिनीवर कोसळले. हल्ल्यासाठी वापरलेला टोचा मर्चंट यांच्या हातात खुपसून अनोळखी माथेफिरू पसार झाला. मर्चंट यांना उपचारासाठी वसईच्या कृष्णा या रुग्णालयात दाखल केले असून शस्त्रक्रिया करून त्यांच्या हातात खुपसलेला टोचा काढण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अज्ञात हल्लेखोराविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हा माथेफिरू हल्लेखोर नेमका कोण होता, उद्देश काय होता, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी दिली आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात हल्लेखोर हल्ला करत असल्याचे स्पष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे. माझे कुणाशी दुष्मनी नाही, माझ्यावर हल्ला कोणी व का केला हेच मला कळत नसल्याची जबानी मर्चंट यांनी रेल्वे पोलिसांना दिली आहे.