मुंबई : भायखळ्याच्या घोडपदेव परिसरात वेडे चाळे करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी हटकले. त्याला पळवून लावताच तो एका इमारतीत सुरू असलेल्या शिकवणी वर्गात शिरला. त्याला पाहून विद्यार्थी किंचाळले. त्याने स्वयंपाकघरातील चाकू एका मुलीवर फिरवला. मुलीने बाहेर पळ काढताच त्याने एका विद्यार्थ्यासह स्वत:ला स्वयंपाकघरात कोंडून घेतल्याने खळबळ उडाली.
त्याच्याविरुद्ध भायखळा पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीर घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मुलावर चाकूहल्ला करत गॅस सुरू केला. मोठी दुर्घटना होण्याआधीच पोलिसांनी फिल्मी स्टाइलने मुलाची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले. ही घटना भायखळा बाबू गेनूनगरच्या हेरंब दर्शन इमारतीत शुक्रवारी सायं. ५ वाजता घडली.
लेबंतो पटेल असे आरोपीचे नाव सांगत असून तो ओडिसाचा रहिवासी आहे. शुक्रवारी पटेल घोडपदेव येथील मराठा कंपाउंड परिसरात जाऊन तो विचित्र चाळे करू लागला. नागरिकांनी त्याला हटकताच तो घराच्या कौलांवर चढला. घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खिडकीद्वारे घरात प्रवेश करत मुलाला बाहेर काढले आणि पटेलला पकडले. हल्ला करताना त्याने स्वतःलाही जखमी करून घेतल्याने त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.