तेलंगणा राज्यातील मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये एक थरारक अपघात घडला. वन खात्याच्या चेकपोस्टवर तपासणी टाळण्यासाठी दोन तरूणांनी भरधाव वेगाने दुचाकी चेकपोस्ट खालून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही घाई आणि तपासणी टाळण्याच्या नादात जीवावर बेतला. दोनपैकी मागे बसलेल्या एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या काळजाचा थरकाप उडविणाऱ्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
चेकपोस्टवर असलेल्या बॅरिकेट्सखालून गाडी चालवत असलेल्या तरूणाने आपली मान खाली केली. त्यामुळे मान खाली केलेला तरूण वाचला. पण त्याच्या मागे बसलेल्या अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो चेकपोस्टवरील लोखंडी बॅरिकेड्सला धडकला. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. सुदावेनी व्यंकटेश गौड अशी मृत तरूणाचे नाव आहे.
मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टला वन अधिकार वाहनांची तपासणी करत होते. २२ मेला दोन तरूण एका दुचाकीवरून पोलिसांना टाळण्यासाठी वेगाने येत होते. त्यावेळी वन अधिकाऱ्याने हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र, तरीही दुचाकीस्वारानी वेग कमी केला नाही. उलट त्याने चेकपोस्टवरील तपासणी टाळण्यासाठी आपला वेग आणखी वाढवला. हे अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी चेकपोस्टवर असलेल्या बॅरिकेट्स शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला.