मीरारोड - आर्थिक संकटात सापडलेल्या वसईतील एका कुटुंबाने काशीमीराच्या एका लॉजमध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर पत्नी जिवंत राहिल्याने तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करून, पती पसार झाला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत सीझन्स नावाची लॉज असून २७ मे रोजी लॉजमध्ये वसईतील राहणारे रायन ब्राको (३८) , त्याची पत्नी पूनम (३०) व ७ वर्षांची मुलगी अनायका हे राहण्यास आले होते. परंतु सोमवारी ३० मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास रायन लॉजमधून एकटाच निघून गेला. दुपारी १ च्या सुमारास पूनमचा मदतीसाठी आरडा ओरडा ऐकून लॉजचे वेटर धावले.
आतील परिस्थिती पाहून काशीमीरा पोलिसांना पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिका बोलावण्यात येऊन निपचित पडलेल्या अनायकासह आई पूनम हिला भाईंदरच्या भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. येथे अनायका हिचा आधीच मृत्यू झालेला असल्याचे सांगण्यात आले. तर पूनमवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. खोलीत रॅट किलर गोळ्या व खटनीलची बाटली सापडली असून बाटलीत तळाला थोडेसेच विषारी रसायन शिल्लक होते.
पोलिसांनी पूनमकडे विचारपूरस केल्यावर आर्थिक तणावामुळे कुटुंबाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रायनने विषारी द्रव्य व गोळ्या आणल्या होत्या. रविवारी रात्रीनंतर त्याने मुलीला व पत्नीला विष दिले आणि स्वतः देखील घेतले. मुलीचा मृत्यू झाला पण पत्नी जिवंत असल्याने त्याने तिचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध पडली असता मेली, असे समजून रायन तेथून पळून गेला, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी घटनेची नोंद करून रायनचा शोध सुरू केला आहे. त्यांचे नातेवाईक व परिचित यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत . पूनम पूर्ण शुद्धीत आल्यावर तिच्याकडून सविस्तर माहिती समोर येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.
सदर कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते . रायन हा खाजगी कंपनीत काम करत होता तर पूनम हि शिक्षिका म्हणून काम करत होती. तसेच ३ महिन्या पूर्वी त्यांनी एव्हर शाईन सिटीमधील घर विकले होते. तर काशीमीराच्या लॉजमध्ये येण्याआधी वसईच्या बाभोळा नाका येथील एका लॉजमध्ये हे कुटुंब काही दिवस रहायला होते, असे सूत्रांनी सांगितले.