Crime News : हरयाणाच्या फरीदाबादमधून फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत काही लोकांनी एका महिलेला किडनी दान करण्यासाठी तयार केलं. इतकंच नाही तर तिची किडनी काढून एका रूग्णावर ट्रांसप्लांटही केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपींनी महिलेच्या पतीला नोकरी लावून दिली नाही तेव्हा तिला जाणीव झाली की, तिच्यासोबत दगा झाला आहे.
पीडित महिलेने याबाबत पोलीस आयुक्त विकास अरोडा यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोलीस कमिश्नर यांनी या केसच्या चौकशीचे आदेश एसीपी महेंद्र वर्मा यांच्याकडे दिले. पोलिसांनी सांगितलं की, केसची चौकशी केली जात आहे. यात सत्य आढळलं तर एफआयआर दाखल करून आरोपींना अटक केली जाईल. त्यांनीही किडनी ट्रांसप्लांटशी संबंधित गॅंग सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं की, ही घटना पलवलच्या रिंकी सौरोतसोबत घडली आहे. ती पतीसोबत बल्लभगढमध्ये राहते. रिकींने पोलिसांना सांगितलं की, साधारण 2 वर्षाआधी फेसबुक अकाउंटवर किडनी दान करण्याची एक जाहिरात पाहून त्याला सहमती दिली. पण काही लोकांनी तिला संपर्क केला तर तिने किडनी दान करण्यास नकार दिला. नंतर आरोपींनी तिला पतीला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं आणि ती त्यात फसली.
पोलिसांनुसार, रिंकीची किडनी दिल्लीच्या विनोद मंगोत्रा नावाच्या व्यक्तीला ट्रांसप्लांट केली जाणार होती आणि नियमानुसार परिवारातील सदस्यच किडनी दान करू शकतात. अशात आरोपी विनोदने पत्नी अंबिकाच्या नावाने रिंकीचं फेक आधार कार्ड बनवलं होतं. आरोप आहे की, नंतर क्यूआरजी हॉस्पिटलने रिंकीची किडनी विनोदला लावली होती. महिलेने यात हॉस्पिटलचाही हात असल्याचा आरोप केला आहे.