पन्ना : पन्नाच्या जंगलात भयानक घटना घडली आहे. शिकाऱ्यांनी एका वाघाला झाडावर लटकविले आहे. ही घटना समजताच वनाधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू देखील सरकली आहे. वन विभागाची टीम सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झाली पण समोरील दृश्य पाहून हादरली आहे.
क्रूर शिकाऱ्यांनी वाघाला मारून त्याला झाडाला दोरखंडावर लटकविले आहे. मध्य प्रदेशच्या पन्नाच्या जंगलात वाघाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. वाघाला फासावर लटकवून त्याला मारण्याची ही देशातील पहिलीच घटना असेल असे बोलले जात आहे. वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. एसटीएफ टायगर टीम आणि बडे अधिकारी देखील तिथे पोहोचले आहेत. यावरून घटनेची क्रुरता आणि गांभीर्य लक्षात येते.
पन्नाच्या जंगलातून २००९ मध्येच वाघ संपले होते. वाघांना पुन्हा संजिवनी देण्यासाठी तिथे टायगर रिलोकेशन मोहीम उघडण्यात आली होती. ही जगातील पहिली यशस्वी मोहिम ठरली होती. तिथेच असे झाल्याने खळबळ उडाली आहे. पन्नामध्ये गेल्या १३ वर्षांत वाघांची संख्या ७० झाली आहे. या वाघाला फासावर कोणी चढविले हा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावत आहे.
उत्तर वनविभागाच्या पन्ना परिक्षेत्रांतर्गत विक्रमपूर येथील तिलगवा बीटमध्ये वाघाचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विक्रमपूर नर्सरीजवळ या वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन वर्षांच्या नर वाघाचा मृत्यू ही चिंतेची बाब आहे. वाघाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. यामुळे पन्नातील अख्खी मोहीम आणि त्यासाठी घेतलेले कष्ट धोक्यात आले आहेत.