मुंबई - टिळक नगर आगप्रकरणी मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांच्याविरुद्ध गुन्हा टिळक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या तिघांविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक काळे याप्रकरणी तपास करत आहेत.
टिळक नगर येथील सरगम इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागल्याने पाच जणांना नाहक जीव गमवावा लागला. ही इमारत मेसर्स रिलायन्स रिअल्टर्सचे पार्टनर हेमेंद्र मापारा, सुभक मापारा आणि कोठारी यांना तेथील रहिवाश्यांनी मे २००६ साली पुनर्विकासासाठी दिली होती. या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विकासकाने २०१४ साली त्याचा ताबा रहिवाश्यांना दिला. मात्र, या इमारतीची अग्निशमन यंत्रणा विकासकाने योग्यरीत्या कार्यान्वित केली नव्हती आणि नियमानुसार १५ व्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर ठेवण्यात येणाऱ्या रिफ्युजी एरियामध्ये (मोकळी जागा) भिंत घालून इमारतीतील बी विंग आणि सी विंग यांना जोडणारा आपत्कालीन मार्ग बंद केला होता. या इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नसतानाही फ्लॅटधारकांना या इमारतीत राहण्यास भाग पाडून आगीसारख्या आपत्कालीन दुर्घटनेत आपत्कालीन मार्ग जाणीवपूर्वक बंद करून रहिवाश्यांच्या मृत्यूस विकासकास पोलिसांनी जबाबदार धरले आहे. याबाबत सरगम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विवेकानंद चिलया वायंगणकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सुनिता जोशी (72), भालचंद्र जोशी (72), सुमन श्रीनिवास जोशी (83), सरला सुरेश गांगर (52) आणि लक्ष्मीबेन प्रेमजी गांगर (83) अशी मृतांची नावे आहेत. तर श्रीनिवास जोशी (86) आणि अग्निशमन दलाचा जवान छगन सिंह (28) हे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अग्नितांडवात मृत्यू पावलेल्या सुनिता जोशी या विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजय जोशी यांच्या मातोश्री होत्या.
टिळकनगर स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू