मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईतून तब्बल साडेपंधरा कोटींची संशयित रोकड जप्त करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्या विविध कारवायांत ही रक्कम हस्तगत करण्यात आली.
निवडणुकीत पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी धडक कृती दलाची क्षमता वाढविण्यात आली आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तूंच्या व्यवहारांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर विभागाने १८००२२१५१० हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. बेहिशेबी रोख रकमेसंबंधी माहितीसाठी (९३७२७२७८२३ / ९३७२७२७८२४) व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तीकर विभागाच्या प्रधान संचालकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.