लाईफ पार्टनरवर खोटे अनैतिक संबंधाचे आरोप करणं ही क्रूरता; हायकोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 09:21 AM2022-12-26T09:21:29+5:302022-12-26T09:21:41+5:30
गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यातील प्रांतिज येथील एका शिक्षकाचं हे प्रकरण आहे. या जोडप्याचं लग्न १९९३ मध्ये झाले होते.
अहमदाबाद - जर एखादी महिला तिच्या पतीविरोधात खोट्या अनैतिक संबंधांचा आरोप लावत असेल तर ती क्रूरता आहे असं सांगत गुजरात हायकोर्टानं पत्नीला फटकारलं आहे. कौटुंबिक न्यायालयाने पतीला घटस्फोट दिला होता त्यावरून पत्नीनं हायकोर्टात अपील केले. हायकोर्टानेही पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे. कौटुंबिक न्यायालयानं दिलेला निर्णय हायकोर्टानं तसाच ठेवत पतीला घटस्फोटाची परवानगी दिली आहे.
गुजरातच्या सांबरकाठा जिल्ह्यातील प्रांतिज येथील एका शिक्षकाचं हे प्रकरण आहे. या जोडप्याचं लग्न १९९३ मध्ये झाले होते. दोघांना २००६ मध्ये एक मुलगा झाला. पतीने २००९ मध्ये गांधीनगर इथं घटस्फोटासाठी अर्ज दिला. पतीने पत्नीवर क्रूरतेचा आरोप केला. पत्नीने २००६ मध्ये घर सोडलं आणि मुलाला घेऊन परतलीच नाही. पत्नीनं पतीविरोधात एका सहकारी महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात पतीला निर्दोष मुक्त केले त्याचसोबत पत्नीकडून दाखल करण्यात आलेला घरगुती हिंसाचार कायद्यातंर्गत गुन्हाही रद्द केला.
कौटुंबिक न्यायालयाने २०१४ मध्ये पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर विभक्त असलेल्या पत्नीने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. पतीने मला सोडलं असा आरोप पत्नीने केला. तर तिने स्वत:हून घर सोडलं आणि घटस्फोटाची नोटीस मिळाल्यावर परतली. पत्नीने माझ्या वृद्ध आई वडिलांवर अत्याचार केले. त्यामुळे त्यांना हक्काचं घर सोडून गांधीनगर येथे राहायला भाग पाडलं. तर पत्नी घटस्फोटानंतरही सासऱ्याच्या घरी राहत होती. हायकोर्टानं दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पत्नीला फटकारलं. पती अथवा पत्नीवर अनैतिक संबंध ठेवल्याचा खोटा आरोप करणे ही क्रूरता आहे. त्यामुळे पतीला वेदना, नैराश्य, तणाव आणि मानसिक दडपण येणे स्वाभाविक आहे असं सांगत हायकोर्टानं पतीला दिलेला घटस्फोटाला निर्णय कायम ठेवला.