पूर्णियाचे एसपी कार्तिकेय शर्मा यांनी पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना एक व्हिडीओ बनवून धमकावल्याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी भोजपूर येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने कबूल केलं आहे की, खासदाराच्या जवळच्या काही लोकांनी सुरक्षा पुरवण्यासाठी व्हिडीओ बनवण्यास आणि धमकी देण्यास सांगितलं होतं.
पप्पू यादव यांच्या लोकांनी त्यासाठी पैसेही दिले. याशिवाय पक्षात पद देण्याचं आमिषही देण्यात आलं होतं. पूर्णियाचे एसपीने यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पूर्वी खासदाराच्या जवळचा एक होता आणि पक्षाचा सदस्यही होता. लॉरेन्स बिश्नोई गँगशी त्याचा कोणताही संबंध नाही किंवा दूरपर्यंत तशी काही शक्यताही दिसत नाही. हे संपूर्ण प्रकरण खासदाराची सुरक्षा वाढवण्याच्या कटाचा भाग आहे.
राम बाबू असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पूर्णियाचे खासदार पप्पू यादव हे पोलिसांचा दावा फेटाळत आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट देखील केलं आहे. अटक करण्यात आलेला आरोपी राम बाबू राय याने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगून पप्पू यादवला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
१ डिसेंबरला सकाळी आरोपींनी १३ सेकंदाचा एक व्हिडीओ पाठवला होता, ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, आम्हाला पप्पू यादवला ५-६ दिवसांत मारण्याचे आदेश मिळाले आहेत, आम्ही त्याला लवकरच मारून टाकू, आम्ही पाटण्याला पोहोचलो आहोत. यानंतर पोलिसांनी आरोपी राम बाबू राय याला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.