आग्रा – उत्तर प्रदेशच्या आग्रा इथं बँक मॅनेजर सचिन उपाध्याय हत्याकांडाला १२ दिवस उलटले असून या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रियंकाने सचिनला मारून टाकले. त्यानंतर जेव्हा त्यांची घरची कामवाली घरी आली तेव्हा प्रियंकाने तिला कढी भात आणि १६ चपात्या बनवण्यास सांगितले. प्रियंकाने घरातील कुणालाही संशय वाटू नये त्यासाठी इतके जेवण बनवायला सांगितल्याचा पोलिसांना अंदाज आहे.
यावेळी प्रियंकाने सचिनचा मृतदेह खोलीत लपवला होता. प्रियंकाने सुरुवातीला अनेकांच्या डोळ्यात धुळफेक केली. इतकेच नाही प्रियंकाने दोनदा शेजाऱ्यांकडे मोबाईल मागितला आणि वडिलांशी बोलणं केले. तिचे वडील बार असोसिएशनचे अध्यक्ष बिजेंद्र रावत आहेत. सध्या प्रियंका फरार आहे, पोलीस तिचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे बँक मॅनेजर सचिनच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम झाल्यापासून हत्येचा गुन्हा दाखल होण्यासाठी ४ दिवस लागले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे प्रियंकाला पळण्यास मदत झाली असा आरोप सचिनच्या घरच्यांनी केला. १२ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजल्याच्या आसपास सचिनने सुसाईड केल्याचा कॉल पोलिसांना आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या शरीरावर जखमा आणि जळाल्याच्या खूणा आहेत. गळ्यावरही काही चिन्हे आहेत. पोस्टमोर्टममधून त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात पत्नी, मेव्हणा आणि सासऱ्याचा समावेश आहे. शुक्रवारी पोलिसांनी सचिनचा मेव्हणा कृष्णा रावतला जेलमध्ये पाठवले तर पत्नी प्रियंका फरार आहे. सचिन उपाध्यायची हत्या ११ ऑक्टोबरच्या रात्री झाली होती. १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता पोलिसांना माहिती मिळाली. जवळपास १७ तास सचिनचा मृतदेह लपवण्यात आला होता. जर परिसरात सीसीटीव्ही नसते तर सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असती असं सचिनच्या कुटुंबाने सांगितले.
अनेक तासांच्या प्लॅनिंगनंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट केल्यावर प्रियंकाने सचिनने आत्महत्या केली असा बनाव रचला. सचिनच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत ज्या खोलीत सचिनची हत्या करण्यात आली तिथे प्रियंकाने टाळा लावल्याचं म्हटलं. घटनास्थळावर सर्वात आधी पोहचणारा प्रियंकाचा भाऊच होता जो संध्याकाळी घरी गेला. सचिनच्या सासऱ्याचाही त्याच्या हत्येत सहभाग आहे असं सचिनच्या वडिलांनी सांगितले. सचिनची गळा दाबून हत्या करण्यात आली. परंतु त्याआधी इस्त्रीने त्याला गरम चटके दिले. सचिनचा गळा कुणी दाबला, त्याला कुणी पकडलं होतं का या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहेत.