लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करत तरुणाचे अपहरण करत त्याच्याकडील ७ लाखांची रोकड लुटणाऱ्या दुकलीला एलटी मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज भीमसेन कांबळे (४१), राहुल विलास पेडणेकर (४०) अशी अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसांची नावे आहेत.
वांद्रे परिसरात राहणारे २५ वर्षीय स्वप्नील भगवान पोटे हे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मालकाची पैशाची बॅग घेऊन जात असताना ही घटना घडली. काळबादेवी रोड येथील कसारा चाळ येथे त्यांच्या मागावर असलेल्या दुकलीने पोलिस असल्याची बतावणी करत चौकशी सुरू केली. तरुणाला जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवून रे रोड येथे घेऊन गेले. तेथे त्याच्याकडील ७ लाख रुपयांची रोकड काढून घेत, ती पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करायचे असल्याचे सांगून निघून गेले. एलटी मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला व एलटी मार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योती देसाई, पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपीच्या भायखळा, दादर, सायन, माटुंगा, आझाद मैदान, एमआरए पोलिस ठाणे हद्दीतील सरकारी व खासगी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवून गुप्त बातमीदारांकडून कमीत कमी वेळात माहिती घेऊन आरोपी राज कांबळे याला माटुंगा येथून व राहुल पेडणेकर यास ललू भाई कंपाऊंड येथून ताब्यात घेतले. दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.
तीन लाखांचे कर्ज आणि रचला कट एक आरोपी एका स्टुडिओमध्ये काम करतो, तर दुसरा सेल्स कंपनीत नोकरीला होता. एकाची नोकरी सुटली होती. त्यात एकावर दोन, तर दुसऱ्यावर एक लाखाचे कर्ज होते. दुसरीकडे, काळबा देवीतील व्यापाऱ्यांकडे काळा पैसा असतो, त्यामुळे पैसे चोरीला गेले तर त्यांच्यापैकी कुणीही तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचा दोघांचा समज होता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच लुटीचा डाव आखला. ठरल्याप्रमाणे पैसेही चोरी करून पसार झाले.