नागपूर : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास खुप फायदा होईल, अशी बतावणी करून सायबर गुन्हेगार महिला आणि पुरुषाने एका महिलेची ५ लाख ६० हजारांनी फसवणूक केली. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनिषनगर येथे युको बँकेजवळ एक ३९ वर्षांची महिला राहते. ही महिला आपल्या घरी असताना तिला फेसबुकवर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होत असल्याची जाहिरात दिसली. महिलेने जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. हेना मेहता नावाच्या महिलेने व गांधी नावाच्या व्यक्तीने संगणमत करून महिलेला ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले फायदे होत असल्याची बतावणी केली. त्यानंतर आरोपींनी महिलेस एका व्हॉट्सअप ग्रुपवर अॅड केले.
महिलेला वेबिनारद्वारे ट्रेडिंगचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर आरोपींनी बेस्ट इंटरप्रायजेस नावाच्या वेगवेगळ्या बँकेतील खात्यावर ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेकडून ५ लाख ६० हजार रुपये जमा करून घेतले. परंतु महिलेला कोणताही फायदा देण्यात आला नाही. आरोपींनी आपले मोबाईल क्रमांकही बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने बेलतरोडी पोलिसात तक्रार केली. बेलतरोडीचे उपनिरीक्षक अविनाश कराड व सायबर विभागाचे पोलिस नायक पोलिस शिपाई शेषराज टेटवार यांनी आरोपींविरुद्ध कलम ४१९, ४२०, ३४, सहकलम ६६ (क), ६६ (ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.