भाजीपाला सातत्याने महाग होत आहे. अशा स्थितीत भाजी चोरीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील बाजारात एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या घटनेची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली शहर परिसरात लखनौ रोडवर बांधलेल्या नवीन बाजारपेठेत घाऊक भाजीचा व्यापार केला जातो. शहर परिसरातील भाजी मंडई व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर बाजारपेठेतील व्यापारीही येथून भाजी खरेदी करतात. दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरून नेला होता. काल रात्री चोरट्यांनी एका एजंटचे सुमारे 25 किलो टोमॅटो भरलेलं कॅरेट, बटाट्याची पोती व इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य चोरून नेले.
सकाळी मालक राजाराम यांनी पाहिलं असता त्यांना या चोरीच्या घटनेची माहिती मिळाली. सुमारे बारा हजार किमतीचा भाजीपाला व इतर माल चोरट्यांनी चोरून नेल्याचे राजाराम यांनी सांगितले. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी 120 ते 130 रुपयांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तरा काही ठिकाणी 150 रुपये प्रति किलोपर्यंत होत आहे.
सकाळी दहापर्यंत हा बाजार सुरू राहतो आणि नंतर बंद होतो. त्यामुळे ते टोमॅटो तिथेच ठेवतात. व्यापऱ्यांनी आम्ही टॅक्स देत असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतरही बाजार प्रशासन सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करत नाही. त्यामुळे रोजच चोरीच्या घटना घडत आहेत. आता व्यापारी स्वतः मालाची काळजी घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.