मुंबई - धावती लोकल पकडणे हे जीवघेणे आहे, अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, धावती लोकल पकडण्याच्या मोह न आवरल्याने अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अशाच पद्धतीने दादर स्थानकावर रविवारी पहाटे धावत्या लोकलमध्ये प्रवेश करण्याचा मोह न आवरल्याने सुदर्शन चौधरी या तरुण ट्रेकरचा मृत्यू झाला.
मुळचा नागपूर येथील असलेला ३१ वर्षीय सुदर्शन मालाड येथे वास्तव्यास होता. सुदर्शन आई-वडिलांना एकुलता एक होता. सुदर्शनचे लग्न दोन महिन्यांवर येवून ठेपले होते. यामुळे घरी लग्नाची तयारी सुरु होती, अशा वातावरणात रविवारी ट्रेकिंगला जातो म्हणून निघालेला सुदर्शन ट्रेकिंगला आला नाही आणि घरी ही परतला नाही. मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल दादर रेल्वे पोलिसांकडे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. सुदर्शनच्या मित्रांसह दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. पासाअंती सीसीटीव्ही फुटेजनूसार, दादर येथून फलाट क्रमांक १ वरुन धावती लोकल पकडताना तोल गेल्यामुळे दादर फलाटाजवळ (ठाणे दिशेकडील) सुदर्शनचक्र अपघात झाला असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, संपूर्ण धावपळीत सुदर्शनची तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेपासून ते मृतदेह ताब्यात देण्याच्या प्रक्रियेपर्यंत पोलिसांनी चांगला प्रतिसाद दिल्याने सुदर्शनच्या मित्रांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक फारुख शेख, रेल्वे पोलीस गणेश बागवे आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे आभार मानले.
धावती लोकल पकडू नये
शनिवार-रविवार सुट्टी असल्याने मुंबईतील विविध ट्रेकर ग्रुप आणि तरुणाई ट्रेकिंगसाठी कसारा, कर्जत येथे जातात. आठवड्याभरातील थकवा दूर करण्यासाठी ‘ट्रेकिंग’ला तरुणाईंचा चांगला प्रतिसाद मिळतो. कोणतेही धाडस करताना आपल्या कुटूंबियांचा विचार करावा. यामुळे तरुणांसह सर्व प्रवाशांनी योग्य भान राखून प्रवास करावा, धावती लोकल पकडू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे.
- प्रसाद पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर रेल्वे पोलीस