बीड : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन भडकावणारे 'टुलकिट' प्रसारीत केल्याच्या आरोपावरून बीडमधील शंतनू मुलूक नावाच्या तरूणाच्या शोधात दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. परंतु त्यांना शंतनू न मिळाल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याचे सूत्रांकडून समजते. दिल्ली आंदोलनाचे धागेदोरे बीडमध्ये असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या रॅलीत हिंसाचार झाला होता. लाल किल्यावर शेतकरी आंदोलक चाल करून गेले होते. हे सर्व पूर्वनियाेजित होती आणि याची पाळेमुळे कॅनडास्थित 'टूलकिट'मध्ये होती. पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने या टूलकिटवरच ट्विट केले होते. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करीत आहेत. यात बंगळूरमधील दिशा रवी नामक कार्यकर्तीलाही अटक केली आहे. याच प्रकरणाशी बीडमधील शंतनू मुलूक या ३२ वर्षिय तरूणाचा संबंध असल्याचा संशय आहे. याच संशयावरून दिल्ली पोलीस बीडमध्ये तळ ठोकून होते. बीड पोलीस व सायबर सेलच्या मदतीने त्यांनी या संशयित तरूणाचा शोध घेतला, परंतु त्यांना तो मिळून आला नाही. अखेर हे पोलीस रिकाम्या हाताने परतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणाशी बीडचा संबंध आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जागतिक पातळीवर कामबीडमध्ये संशयित असलेल्या तरूणाचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरूणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरूवातीपासूनच पाठिंबा दर्शविला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.
दिल्ली प्रकरणात बीडमधील एका तरूणावर संशय असल्याने दिल्ली पोलीस आले होते. परंतु सदरील तरूण मिळून न आल्याने ते परत गेले आहेत. -आर.राजा, पोलीस अधीक्षक, बीड