टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट जामिनावर हायकोर्ट उद्या देणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 20:20 IST2021-02-16T20:19:34+5:302021-02-16T20:20:14+5:30
Toolkit Case : दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला.

टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट जामिनावर हायकोर्ट उद्या देणार निर्णय
मुंबई : टूलकिट (दस्तावेज) प्रकरणी संशयित असलेल्या वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. दिल्ली पोलिसांना अटकेची कारवाई करता येऊ नये, यासाठी निकिता जेकब यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली.
दिल्ली पोलिसांनी त्यांच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. निकिता 'टूलकिट'च्या एक संपादक आहेत. निकिता यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, तपासाला सहकार्य करत असताना तिला केली जाऊ शकत नाही. टूलकिटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की त्यामुळे लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेसाठी 'टूलकिट' ला जबाबदार धरण्यात यावे.
'टूलकिट' प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून बीडमध्ये संशयित तरूणाचा शोध
दरम्यान, निकिता यांचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, याच प्रकरणात संशयित असलेले शंतनू मुळूक यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला. मात्र, यावर दिल्ली पोलिसांच्यावतीने वकील हितेन वेणेगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात हे प्रकरण येत नसल्याने न्यायालय त्यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटले. निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा सराव करतात. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून सोमवारी दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांच्याविरोधात अजामिनपत्र वॉरंट बजावले.