राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कोठडीत पुन्हा कोर्टाकडून वाढ करण्यात आली आहे. ईडीने पुढील चौकशीसाठी देशमुखांची कोठडी वाढवून मागितली होती. ईडीच्या कोठडीला विरोध करत अनिल देशमुखांच्यावतीने जोरदार युक्तिवाद देखील केला गेला. तरी देखील ईडीने आणखी ३ दिवसांची कोठडी वाढवून मागितली. युक्तिवादावेळी ईडीने अनिल देशमुखांची कोठडी चौकशीसाठी नको, तर केवळ त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, दरदिवशी ८-९ तास चौकशी करून देशमुखांचा ईडी कोठडीत छळ सुरू आहे. त्यांना मानसिकरित्या त्रास दिला जात आहे, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी केला.
जर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचं स्टेटमेंट दुसऱ्या कोठडीत असताना घेता येतं, तर मग देशमुखांचं का नाही घेता येत? असा युक्तिवाद करत अनिल देशमुखांच्या वकिलांनी ईडी कोठडीला विरोध केला. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांना अद्याप अटक का नाही केली? मी चौकशीसाठी हजर झालो आणि मला अटक झाली असल्याचं अनिल देशमुखांच्यावतीने ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी सांगितलं.
सुनावणीच्या सुरुवातीला अनिल देशमुखांनी कोर्टाला एक पत्र दिले. हे पत्र देशमुखांनी हाताने लिहिलं आहे. देशमुखांनी या पत्रात मला ईडीच्या रिमांडमध्ये १० दिवस झाले. २०० हून अधिक प्रश्न मला विचारून झाले. आता माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही शिल्लक नाही. त्यामुळे आता पुन्हा ईडी कोठडी वाढवून देऊ नये असे नमूद करून विनंती केली.