लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मुंबईच्या अंधेरी येथील २७ वर्षीय व्यापाऱ्याला वसईतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर २५ लाखांची रोख रक्कम घेऊन सहा दरोडेखोरांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडला आहे. कारमधून आलेल्या सहा दरोडेखोरांपैकी दोघांनी पोलीस वेश परिधान करून तसेच पोलीस पाटी व दिवा ठेवून ही लूट केल्यामुळे खळबळ माजली आहे. वालीव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी वालीव पोलीस, दोन क्राइम ब्राँच अशी चार ते पाच पथके तपास करत आरोपींचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या अंधेरी येथील सहार रोडवरील हयात रिजन्सीमध्ये राहणारे व्यापारी अरिहंत अमित पाबुवाल (२७) हे कोविड साथीच्या अनुषंगाने कोविड साहित्य खरेदी करण्यासाठी मागील तीन ते चार दिवसांपासून आरोपी मनोहरलाल पटेल याच्यासोबत मोबाइलवरून संपर्कात होते. हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर, मास्क हे साहित्य घेण्यासाठी आरोपी पटेल याने व्यापारी पाबुवाल यांना बघण्यासाठी व विकत घेण्यासाठी पैसे घेऊन वसईत वेअर हाउसला बोलावले. व्यापारी दोन मित्रांसोबत २५ लाख रुपये घेऊन कॅब भाड्याने करून शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास महामार्गावर आले. त्यांची गाडी थांबताच मागून सफेद रंगाची कार आली व त्यात दरोडेखोरांनी त्यांना बसवले. तीन साध्या वेशातील आणि दोन पोलीस वेशातील आरोपींनी लाकडी दांडका आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून रोख रकमेची बॅग जबरदस्तीने खेचून व्यापाऱ्याला व दोन्ही मित्रांना गाडीतून उतरवून मुंबईच्या दिशेने पळून गेले.
शुक्रवारी संध्याकाळी व्यापाऱ्याला सहा दरोडेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, तपास करीत आहोत. - विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे.