पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटारचालकाला आरटीओमध्ये जाऊन दंड भरावा लागेल,अशी भीती दाखवत अडीच हजार रुपये उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस फौजदार प्रकाश बाबुराव दौंडकर असे शिक्षा झालेल्या पोलिसांचे नाव आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी ही शिक्षा सुनावली आहे.दौंडकर हे विमानतळ वाहतूक विभागात वाहनांवर कारवाई करणाऱ्या टेम्पोवर आॅपरेटर म्हणून कर्तव्यावर होते.६ फेब्रुवारी रोजी त्यांनी एकाची मोटार टो केली होती. मोटारमालक मोटार सोडविण्यासाठी आले. तेव्हा दौंडकर यांनी त्यांचे वाहन जप्त करण्याची व आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती दाखविली. त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे व हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करुन त्यांच्यामार्फत पैशांची मागणी केली. त्यावेळी मोटारमालकाकडून अडीच हजार रुपये घेतले. उपायुक्त अक्कानुवरु यांनी तक्रारीची चौकशी केली. त्यात दौंडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले. पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी दौंडकर यांना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
...अन् पुण्यात वाहतूक पोलिसालाच मिळाली पाच हजारांचा दंड भरण्याची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 9:04 PM