मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगड़ी करत त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या सर्वांवर परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सिंग यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विरोधात खंडणी, फसवणूक, धमकाविणे सारख्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक करण्यात आली आहे. यापाठोपाठ ठाण्यातही परमबीर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमबीर यांच्यावर दाखल असलेल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासह याच प्रकरणाशी संबंधीत गुन्हे शाखेने याआधी मोक्का अंतर्गत दाखल केलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्याच्या एकत्रित तपासासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस उपायुक्त निमीत गोयल यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक केली आहे. २५ जुलै रोजी ही एसआयटी स्थापना करण्यात आली आहे. अशातच मुंबई, ठाण्यातील दाखल गुह्याचा तपास सुरु असताना, याप्रकरणातील पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पराग मनेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील,श्रीकांत शिंदे आणि पोलीस निरिक्षक आशा कोरके यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
एसआयटीमध्ये यांचा समावेश...
एसआयटीचे प्रमुख पोलीस उपायुक्त निमीत गोयल हे पर्यवेक्षण आणि मार्गदर्शक अधिकारी तर, देवनार विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एम, एम. मुजावर हे तपास अधिकारी आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रिणम परब, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, गुन्हे शाखेतील कक्ष पाचचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील आणि पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांच्यावर सहायक तपास अधिकारी म्हणून या विशेष सामीतीत जबाबदारी देण्यात आली आहे.