राजकुमार जाेंधळे / उदगीर (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह तब्बल ६ लाख ३० हजारांची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क व उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिस पथकाने बुधवारी पहाटे संयुक्तपणे केली. याबाबत तिघांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील तळेगाव येथून अहमदपूरकडे पांढऱ्या रंगाच्या पीकअपमधून (एमएच ०१ एलए १९३७) विदेशी दारूची उदगीर मार्गावरून चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने उदगीर ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली. बुधवारी पहाटे २ वाजता उत्पादन शुल्क आणि उदगीर ग्रामीण ठाण्याच्या पाेलिसांनी उदगीर येथील नांदेडनाका येथे सापळा लावला.
पहाटे २ वाजेच्या सुमारास अहमदपूरच्या दिशेने निघालेल्या एका पीकअप वाहनाला थांबविण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता, त्यात काळ्या रंगाचे ठिबक पाइपखाली ५० पोत्यांमध्ये लपवून ठेवलेल्या दारूचा साठा आढळून आला. पांढऱ्या रंगाचे दारूचे १५० बॉक्स पथकाने जप्त केले. यावेळी ६ लाख ३० हजार रुपयांची दारू आणि वाहन, असा मुद्देमाल जप्त केला आहे.