पुणे : जमिनीची मोजणी करुन त्याचा नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी ७ लाख रुपयांपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली भूमी अभिलेखाचे भूकरमापक व खासगी व्यक्तीला सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा पकडले.
भूकरमापक संजय वामनराव शिंदे (वय ५०, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि खासगी व्यक्ती विकास सर्जेराव वाघमारे (वय ४२, रा. तळ्याचा माथा, देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी करुन त्याचा नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी भूकरमापक शिंदे यांनी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ व ११ आॅक्टोंबरला पडताळणी केली.
शिंदे यांनी विकास वाघमारे याच्याकडे ही रक्कम देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदारांकडून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देहुगाव येथील तळ्याचा माथा येथे स्वीकारताना पकडण्यात आले. देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.