लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: सध्या मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग झाला असताना अशा परिस्थितीत तो हरवला किंवा चोरीला गेला तर मोठा त्रास सहन करावा लागतो. कारण आपले महत्वाचे नंबर आणि डाटा मोबाईलमध्ये सेव्ह असतो. हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल अशी शाश्वती नसताना मानपाडा पोलिसांनी मात्र ३७ जणांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांना परत केले आहेत.
विविध ठिकाणी गेल्या दहा महिन्यात मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या अनेक तक्रारी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. सुमारे १५० ते २०० तक्रारी होत्या. या तक्रारींच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलच्या शोधकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, दिपक गडगे, पोलिस नाईक यल्लपा पाटील, प्रविण किनरे, महादेव पवार, पोलिस शिपाई महेंद्र मंझा यांचे पथक नेमण्यात आले होते.
पथकाने गहाळ झालेले मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषण माहीतीच्या आधारे व सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेले मोबाईल एकूण ३७ मोबाईल फोन महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडु, कर्नाटक, बिहार या राज्यातून हस्तगत केले आहेत अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली. शोधलेले मोबाईल मंगळवारी तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल मिळाल्याबद्दल पोलिसांचे आभार मानताना संबंधितांच्या चेह-यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले. हरविलेला मोबाईल परत मिळेल ही आशा सोडली होती पण पोलिसांनी शोधून दिला यात आनंद आहेच पण त्याचबरोबर पोलिसांवरचा विश्वास अधिकच वाढला अशा प्रतिक्रिया मोबाईल मिळालेल्या नागरीकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
सेंट्रल इकिवपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीइआयआर) या वेब साईटचा वापर करून गहाळ झालेला मोबाईल शोधता येतो. मोबाईल आयएमइआय नंबर तसेच मोबाईल खरेदी केलेली पावती दिल्यास गहाळ मोबाईल शोधण्यास मदत होते. त्यामुळे नागरीकांनी मोबाईल हरविल्यास तत्काळ तक्रार दाखल करणो गरजेचे आहे जेणोकरून लोकेशन ट्रॅक करून तो तत्काळ शोधता येतो असे आवाहन पोलिसांनी केले आहे.