मुंबई : देशद्रोहप्रकरणी कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंदेल यांना अटकेपासून १५ फेब्रुवारीपर्यंत उच्च न्यायालयाने संरक्षण दिले.वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने रनाैत भगिनींवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर दाेघींनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.
न्यायालयाने ही सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करताना म्हटले की, या दोघींच्या अंतरिम संरक्षणात वाढ करण्यात येत आहे.कंगनाने केलेल्या ट्विटवरून ऑक्टोबरमध्ये तिच्याविरुद्ध वांद्रे न्यायालयात खासगी तक्रार केली. कंगना ट्विटरद्वारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा दावा तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.दरम्यान, तक्रारदार मुनाव्वर अली सय्यद यांच्यातर्फे ॲड. रिझवान मर्चंट यांनी उच्च न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. कंगना व तिच्या बहिणीने ट्विटद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वारंवार त्यांनी हेच केले. त्यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी दिलेले निर्देश योग्य आहेत, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, कंगनाविरोधात केलेल्या अवमान याचिकेवरही उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.