ढिगारा हटवताना सापडला ‘खजिना’, मजुरांनी आपापसात वाटून घेतली ८६ सोन्याची नाणी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:37 AM2022-08-31T09:37:33+5:302022-08-31T09:38:19+5:30
Madhya Pradesh News: एक जुने घर पाडणाऱ्या ८ मजुरांना अचानक लाखो रुपयांची सोन्याची नाणी सापडली. इतकं सोनं मिळणं एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. या मजुरांनी ६० लाख रुपयांची सोन्याची नाणी घरमालकाला न सांगता आपसात वाटून घेतली. पण या खजिन्यामुळेच मजुरांना तुरुंगात जावे लागले.
धार : एक जुने घर पाडणाऱ्या ८ मजुरांना अचानक लाखो रुपयांची सोन्याची नाणी सापडली. इतकं सोनं मिळणं एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. या मजुरांनी ६० लाख रुपयांची सोन्याची नाणी घरमालकाला न सांगता आपसात वाटून घेतली. पण या खजिन्यामुळेच मजुरांना तुरुंगात जावे लागले. माहिती मिळताच पोलिसांनी कामगारांना अटक केली.
ही घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडली. १९ आणि २१ ऑगस्ट रोजी २,६०० चौरस फूट जागेत पाडकाम करताना, कामगारांना खजिना असलेले धातूचे भांडे सापडले. त्यात एक किलो वजनाची ८६ सोन्याची नाणी होती. ढिगारा हटवताना ही नाणी मजुरांना सापडली. त्यांनी कोणालाही याबाबत माहिती न देता नाणी आपापसात वाटून घेतली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार म्हणाले की, एका मजुराने एक नाणे विकल्यानंतर आम्हाला या खजिन्याबाबत माहिती मिळाली. या मजुरांनी ही नाणी पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाची असूनही कोणतीही माहिती न देता आपापसात वाटून घेतली. जर ही पुरातत्त्व नाणी असतील तर त्यांची किंमत ६० लाखांवरून १ कोटीपर्यंत वाढेल, असे ते म्हणाले.