औरंगाबाद: सिल्लोड येथे मे महिन्यात वाईनशॉपच्या कर्मचाऱ्याचा धारदार सुऱ्याने खून करून ४ लाखाची रोकड पळविणाऱ्या त्रिकुटांना अखेर स्थानिक गुन्हेशाखेने बुधवारी बेड्या ठोकल्या. घटनास्थळी सापडलेल्या शर्टच्या गुंडीचा धागा पकडून पोलिसांनी ऑनलाईन शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार लोकांमधून हे आरोपी शोधून काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटीली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अजय गुलाबराव रगडे (३०,रा. सातारा परिसर), चेतन अशोक गायकवाड(३४,रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड) आणि संदीप आसाराम गायकवाड(२६,रा. कैकाडी गल्ली, परतूर, जि. जालना)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.भिकन निळूबा जाधव (४८)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, तक्रारदार लक्ष्मण पुंजाजी मोरे (४३,रा. जयभवानीनगर, सिल्लोड) हे भराडी येथील वाईनशॉपचे व्यवस्थापक आहेत. तर मृत भिकन हे त्याच दुकानावरील कर्मचारी होते. १२ मे रोजी रविवारी रात्री दिवसभर व्यवसायाचे जमा झालेली चार लाखाची रक्कम घेऊन ते मोटारसायकलने सिल्लोडला जात असताना अनोळखी लुटारूनी दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. यावेळी लक्ष्मण आणि भिकन यांनी पैशाची बॅग घट्ट पकडून ठेवल्याने आरोपींनी त्या दोघांवर धारदार सुऱ्याने हल्ला करून बॅग पळविली होती. याघटनेत भिकन यांचा मृत्यू झाला होता. याविषयी सिल्लोड शहर ठाण्यात खून आणि लुटमारीचा गुन्हा नोंद झाला होता.
शर्टच्या गुंडीवरून काढला माग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा तेथे त्यांना एक चप्पल आणि आरोपीच्या शर्टचे तुटलेले बटन सापडले होते. बटनवर इंगजीत अक्षर होते. हे अक्षर पोलिसांनी गुगलवर टाकल्यानंतर ऑनलाईन शर्ट विक्री करणाऱ्या चेन्नईच्या कंपनीचे नाव समोर आले. पोलिसांनी त्या कंपनीशी संपर्क साधून घटनेच्या काही महिन्यापूर्वी ऑनलाईन शर्ट खरेदी करणाऱ्या दहा हजार लोकांच्या नावाची यादी मिळविली. ही यादी तपासल्यानंतर २४६ लोक गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे समोर आले.
ऑनलाईन खरेदी केला होता शर्ट आणि सुरा२४६ जणांमध्ये सातारा परिसरातील अजय रगडे याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल असून तो वर्षभरापूर्वीच जामीनावर सुटला होता. शिवाय त्याने सुरा आणि शर्ट ऑनलाईन खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न समजल्याने पोलिसांनी त्याला उचलले. कसून चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली देत चेतन आणि संदीप यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले.आरोपींकडून लुटलेल्या रक्कमेपैकी २४ हजार रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल , मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
३० हजाराचे बक्षीससात महिन्यापासून तपास करीत या गुन्ह्याचा उलगडा करणाऱ्या स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळुंके, कर्मचारी सुधाकर दौड, विठ्ठल राख, नामदेव शिरसाट, सुनील खरात, संजय भोसले, शेख नदीम, विनोद तांगडे, ज्ञानेश्वर मोटे, गणेश गांगवे ,योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांना पोलीस अधीक्षकांनी ३० हजार रुपये बक्षीस जाहिर केले.