मुंबईवरील 26/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या ‘तहव्वूर राणा’ याला भारताच्या हवाली करण्याबाबतचा खटला 12 फेब्रुवारीपासून अमेरिकेत सुरू होणार आहे. हे भारतासाठी मोठं यश असून अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणाऱ्या या खटल्याकडे भारताचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती असून त्याने ‘डेव्हिड हेडली’च्या मदतीने 26/11च्या हल्ल्यासाठी आवश्यक सहाय्य पुरविले होते. राणा याला गुन्हेगार ठरवून भारताने फरार घोषित केले असून अमेरिकेने त्याला भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली आहे.
तहव्वूर राणाचा ताबा भारताला मिळाला, तर २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाचा आणखी एक पुरावा हाती लागू शकतो. यामुळे पाकिस्तानच्या यंत्रणा हवालदिल झाल्या असून राणा याचा ताबा भारताला मिळू नये, यासाठी पाकिस्तान देखील प्रयत्न करत असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. याआधी डेव्हिड हेडली याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अमेरिकेकडे मागणी केली होती. ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्याचा दाखला देऊन तहव्वूर राणा याचाही ताबा भारताला देता येणार नाही, असा दावा राणा याच्या बाजूने केला जात आहे.
मात्र, अमेरिकन विधिज्ञांचे म्हणणे वेगळे आहे. तहव्वूर राणा व डेव्हिड हेडली यांचे प्रकरण वेगवेगळे असून त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा, असे विधिज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे 12 फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा खटला भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने 26/11च्या सूत्रधारांपैकी एक असलेला खतरनाक दहशतवादी साजिद मीर याच्या शीरावर पन्नास लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते.
साजिद मीर याला पकडून देणारी माहिती अथवा त्याला शिक्षा पुरविण्याइतके भक्कम पुरावे देणाऱ्यास हे पन्नास लाख डॉलर्सचे बक्षीस दिले जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने घोषित केले आहे. यामुळे पाकिस्तानवरील दडपण अजूनच वाढले आहे. सध्या एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या पाकिस्तानसाठी साजिद मीर व तहव्वूर राणा यांच्याबाबत आलेल्या बातम्या धक्कादायक ठरत आहेत.