नालासोपारा : विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण टीमने बंद घर फोडून लाखो रुपयांच्या सोनेचांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला अटक केली आहे. या तिन्ही आरोपींकडून २८ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून सहा लाख दाेन हजार रुपयांचे सोनेचांदीचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम, टीव्ही, कंपनीतील कच्चा माल आणि इतर घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत.आरोपींचे कोणी साथीदार किंवा कुठे घरफोड्या केल्या आहेत का, याचा शोध व तपास पोलीस घेत आहेत. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन विरार पोलिसांनी माहिती दिली आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊनच्या काळात वाढत्या घरफोड्यांचे प्रमाण लक्षात घेता पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे, विरारच्या सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. पोलिसांच्या कौशल्याच्या कोरोनाकाळातील लॉकडाऊनदरम्यान घरफोडी करणारे सराईत आरोपी शंकर दिवा हाल्या (३०), रफिक हनीफ शेख (२२) आणि चंद्रकांत रमाकांत साटम (२२) या आरोपींना १८ डिसेंबरला पकडले आहे. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २८ घरफोडी गुन्ह्यांची उकल करून तीन लाख ९८ हजार ३०० रुपयांचे सोनेचांदीचे दागिने, ९९ हजारांचे १७ मोबाइल, २० हजार रुपयांची रोख रक्कम, ८४ हजार ७०० रुपयांचे टीव्ही, कंपनीतील कच्चा माल व घरगुती इतर वस्तू असा एकूण सहा लाख दाेन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरफोडीतील तीन आरोपींना १८ डिसेंबरला अटक करून त्यांच्याकडून २८ गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेला सहा लाख दाेन हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- रेणुका बागडे, सहायक पोलीस उपायुक्त, विरार