मुंबई - शहरातील संघटित टोळ्या नेस्तनाबूत झाल्या असल्या तरी या टोळ्यांच्या म्होरक्यांच्या नावाने अद्यापही खंडणी उकळली जात असल्याचे एल. टी. मार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून उघड झाले आहे. कुख्यात गुंड अरुण गवळी आणि अश्विन नाईक या गुंड टोळ्यांच्या मोरक्यांच्या नावाने भुलेश्वर येथील एका आंगाडियाच्या कंपनीत घुसून खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आशिष हेमचंद्र मांजरेकर (४३), निलेश सुरेश दांडगे (२७) आणि कमलेश सुरेश दांडगे (२४) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
फोफळवाडी, भुलेश्वर येथे खंजन ठक्कर यांच्या मालकीचे नवनीत अंगाडिया आणि कुरिअर सर्व्हिस नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक खंजन ठक्कर हे कामानिमित्त गेल्या ६ महिन्यांपासून दुबईला गेले असून त्यांच्या कार्यालयाचे कामकाज अंधेरी येथे राहणारे हर्षद दर्जी (३९) हे पाहतात. ५ डिसेंबर रोजी ठक्कर यांचे मित्र आशिष मांजरेकर याने त्यांना फोन करून खंज न भाईसे बात करना है, असे सांगून खंजन भाईकडे जे मागितले आहे, ते न दिल्यास ऑफिस उघडून देणार नाही, असे धमकावले. त्यानंतर ४ दिवसांनी मांजरेकर, दांडगे आणि त्यांचे इतर साथीदार पुन्हा ऑफिसमध्ये आले. त्यानंतर ऑफिस बंद करण्याबाबत शिवीगाळ करून धमक्या देऊ लागले. मात्र, दर्जी यांनी ऑफिस बंद करण्यास विरोध केला असता मांजरेकर व त्याच्या साथीदारांनी गुलालवाडी येथील ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांना धमक्या देऊन तेथील ऑफिस बंद करायला भाग पाडले. तेथून मांजरेकर व त्याचे साथीदार दर्जी यांच्या ऑफिसमध्ये आले आणि कुख्यात गुंड अरुण गवळी, अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करू लागले.
घाबरलेल्या दर्जीने या प्रकरणी केवळ शिवीगाळ केल्याची तक्रार एल. टी. मार्ग पोलिसांत दाखल केली होती. मात्र, खंडन ठक्कर यांच्या सांगण्यावरून त्याने गवळी आणि अश्विन नाईक यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली. यानुसार एल. टी. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करून मांजरेकर निलेश दांडगे आणि कमलेश मांजरेकर या तिघांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अटक आरोपींनी अन्य व्यावसायिकांकडून देखील अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. भुलेश्वर आणि परिसरात आंगाडियांची अनेक कार्यालये असून त्यांच्या कार्यालयात घुसून लूटमार करणे, खंडणीसाठी धमकावणे याचबरोबर चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने येथील आंगाडियांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.