मुंबई : मालवणी पोलिसांनी अफनान पटेल (२३) याच्याविरोधात तीन तलाकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने पत्नीला व्हाॅट्सॲपवर तलाक, तलाक, तलाक असा मेसेज केल्याचा आरोप आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. पटेल याचे लग्न महिरा (नावात बदल) यांच्याशी डिसेंबर, २०२३ मध्ये झाले. पटेल हा मालाड पश्चिमच्या इनॉर्बिट मॉलमध्ये काम करतो.
महिराच्या तक्रारीनुसार, पटेल याचे अन्य मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे मोबाइल पाहिल्यावर त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी पटेल याला जाब विचारताच त्याने अन्य मुलीशी संबंध असल्याची कबुली देत तुला जे करायचे ते कर, असे त्याने धमकावले. वाद घालत त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप महिराने केला. तो त्या मुलीला भेटायला जात असून, पत्नीला वेळ देत नसल्याचे तिचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हणणे आहे.
पती- पत्नीमध्ये वादनुकतेच लग्न झाल्याने हा प्रकार तिने माहेरी सांगितला नव्हता. मात्र, त्यानंतर पटेलने त्यांना तलाक देण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. या दोघांमध्ये व्हाॅट्सॲपवर चॅटिंगदरम्यान वाद सुरू होते. अखेर पतीने त्यांना तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असा मेसेज करत मैं तुम्हारे मामा से बात करूंगा इस बारे मे, असेही लिहिले. तसेच, सासरच्या मंडळींसमोर ३० मे रोजी त्याने घटस्फोटाचे पेपर तयार करा, तलाक द्या आणि निघून जा, असे म्हणत मोठ्याने तीन वेळा तलाक असे म्हटले. याप्रकरणी महिरा यांनी घरच्यांना कळवले आणि मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.